‘ग्रीन पार्क’ प्रकल्प एका महिन्यात पूर्ण करा, व्याजासह भरपाई द्या; महारेराचा दणका, मुदतीत काम पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा
दक्ष टाईम्स न्यूज नेटवर्क
पिंपरी : दापोडी येथील ‘ग्रीन पार्क’ या निवासी प्रकल्पातील सदनिका धारकांच्या न्यायालयीन लढ्याला यश आले असून, महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) विलंबास जबाबदार धरत विकसकाला व्याजासह भरपाई देण्याचे व एका महिन्याच्या आत प्रकल्प पूर्ण करण्याचे ठोस आदेश दिले आहेत. ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी दिला आहे.
या प्रकरणी तक्रारदार सागर नवले व विश्वजित भिडे यांनी सहकार तज्ज्ञ ॲड. अजित बोराडे यांच्या मार्फत महारेराकडे जुलै २०२५ मध्ये दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावर २९ जानेवारी २०२६ रोजी आदेश पारित करत महारेराने रेरा कायद्याच्या कलम १८ चा आधार घेत मुदतीत ताबा न दिल्यास सदनिका धारकांना व्याज देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पाला अद्याप वापर प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले नसून नोंदणीची मुदतही संपलेली असल्याने विलंब निर्विवाद असल्याचे महारेराचे अध्यक्ष सौनिक यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार नवले व भिडे यांनी ‘ग्रीन पार्क’ या निवासी प्रकल्पातील सदनिकांसाठी अनुक्रमे ४५ लाख व ३५ लाख रुपये भरले होते. मात्र, ताब्याची मुदत उलटूनही बांधकाम प्रगती न दिसल्याने त्यांनी महारेराकडे दाद मागितली होती. त्यावर महारेराचे अध्यक्ष सौनिक यांनी दिलेल्या आदेशानुसार व्याजासह भरपाई देण्याबरोबरच प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
————–
कोट
विकसकाने ठरलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण न करता कायद्याचे उल्लंघन केले होते आणि सदनिका धारकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यावर महारेराने दिलेला हा निर्णय केवळ नुकसानभरपाईपुरता मर्यादित न राहता सर्व सदनिका धारकांना प्रत्यक्ष दिलासा देणारा ठरला आहे. तसेच बेजबाबदार विकसकांसाठी तो महत्त्वाचा कायदेशीर इशारा आहे.
एड अजित बोराडे, तक्रारदारांचे वकिल.



Leave a Reply