समाज कल्याण विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात NSUIचे तीव्र आंदोलन
पुणे :
नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) तर्फे समाज कल्याण विभागाच्या बेजबाबदार, निष्क्रिय व बोगस कारभाराविरोधात आज तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक लाभांबाबत सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने NSUIने हा आक्रमक पवित्रा घेतला.
निर्वाह भत्ता, स्वाधार व महाडीबीटी शिष्यवृत्ती प्रलंबित
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये गेल्या चार महिन्यांपासून रखडलेला निर्वाह भत्ता, स्वाधार योजनेचे प्रलंबित हप्ते तसेच महाडीबीटी (Mahadbt) अंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तींचा समावेश होता. अनेक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेल्या नसल्याचा आरोप NSUIकडून करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये वाढ
शैक्षणिक वर्ष 2024–2025 संपून बराच कालावधी लोटला असतानाही स्वाधार योजना व महाडीबीटी शिष्यवृत्ती अद्याप अदा न झाल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. यामुळे गरजू व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, जेवण तसेच दैनंदिन गरजांसाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निधीअभावी कारण देणे अस्वीकार्य : NSUI
या संदर्भात समाज कल्याण विभाग, पुणे विभागाकडून “सध्या निधी उपलब्ध नाही” असे लेखी कारण देण्यात आल्याचे NSUIने सांगितले. मात्र निधीअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य अडवणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
या आंदोलनात NSUI पुणे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांभुळकर, महासचिव विकास अवचार यांच्यासह सुशांत दसाडे, संदीप गायकवाड, ओंकार बिनवडे, सुष्मिता हरणे, अनिकेत गावडे, अविनाश राठोड, रविंद्र इंगळे तसेच NSUIचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



Leave a Reply